बिबट्याच्या दर्शनाने खंडाळा परिसरात भीतीचे वातावरण

Foto
वैजापूर, (प्रतिनिधी) : वैजापूर तालुक्यातील खंडाळा गावठाणालगत बिरोबानगर परिसरात बिबट्या आढळल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
मका सोंगण्यासाठी येणाऱ्या हार्वेस्टरच्या आवाजाने मक्याच्या शेतात दडून बसलेल्या बिबट्या बाहेर निघाला. शेजारीच गव्हाला पाणी देत असलेले शेतकरी व हार्वेस्टर चालकांनी बिबट्याला बघितले. मात्र तो पळून बांधावरील झुडपामध्ये जाऊन बसला. बिबट्या जागा सोडत नसल्याने बांधावरील झाडे झुडपे काढण्यासाठी जेसीबी बोलावण्यात आले. जेसीबीच्या आवाजाने ज्ञानेश्वर पवार गट नंबर ५२२ यांच्या शेतातून किरण सोनवणे गट नंबर ५१६ शेतात बिबट्या पळून गेला. 

ज्ञानेश्वर पवार यांनी सांगितले की, गावातील डुकरे शेतात मका व इतर पिकाची नासाडी करण्यासाठी येत असल्याने डुकरांच्या शिकारीसाठी बिबट्या येत आहे. ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे पोलीस पाटील नितीन बागूल यांनी घटनेची माहिती दिली आहे.

शेतकरी शेतात राहत असल्याने व जनावरेही राहत असल्याने बिबट्याची मोठी भीती निर्माण झाली आहे. या बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक शेतकऱ्यांमधून होत आहे.